अभिनय खोपडे, गडचिरोली२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे पुरावे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तपासात आढळून आले आहेत. आणखी २४ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील बोगस विद्यार्थ्यांची संख्या ध्यानी घेता त्यांना ४ हजार ४२० कोटी रुपये अदा करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वाटपाबाबत महाराष्ट्र सरकारचे कोणतेही धोरण नसल्याने बोगस संस्था मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मलिदा खात आहेत. मागील चार वर्षांत ६५ लाख ३३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे नावे नोंदविली. त्यापैकी प्रलंबित २३ लाख ७७ हजार ४५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २०१४-१५मध्ये ४ हजार ४२० कोटी रूपये लागणार आहे. केंद्र सरकारकडून येणारी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षाच्या सुरूवातीलाच दिली जाते. ती पूर्ण खर्च झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार एवढी रक्कम कशी उभी करणार, हा प्रश्न आहे.गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीतून बोगस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचे वास्तव पुढे आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, केंद्र सरकारची ही भारत सरकार शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. अनेक महाविद्यालयांनी अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बोगस नावे नोंदवून त्यांची शिष्यवृत्ती स्वत:च घशात टाकली. त्यांनी बँक खातेही बनावट उघडले.
हजारो कोटींची शिष्यवृत्ती संकटात
By admin | Updated: February 23, 2015 02:44 IST