औरंगाबाद : पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील पाणीटंचाईने अधिकच भीषण स्वरूप धारण केले आहे. विभागातील बाराशेपेक्षा जास्त गावे सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. यापैकी सहाशे गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित सहाशे गावांना जवळपासच्या भागातील विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.मराठवाड्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. सुरुवातीला औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांतील काही गावांनाच टंचाईचे चटके बसत होते. मात्र, हळूहळू टंचाईने भीषण स्वरूप धारण केले. मे महिन्यात विभागातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये ही टंचाई जाणवू लागली. आता जून महिन्यात तर ही टंचाई आणखीच वाढली आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ९५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. चालू आठवड्यात यामध्ये आणखी अडीचशे गावांची भर पडली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्याही मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात ४६ ने वाढली आहे. सद्य:स्थितीत विभागातील ६०९ गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २२२ टँकर सुरू आहेत, तर सर्वांत कमी १ टँकर हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.
मराठवाड्यातील १२00 गावे तहानली
By admin | Updated: June 14, 2014 04:49 IST