पुणे : कोल्हापूरला जाऊन पैलवान होण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांमध्ये लुटमार करणाऱ्या चौघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण करण्यासाठी या तरुणांना पैलवान व्हायचे होते. या चौघांकडून एकूण ५ लाख २४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. अमर बाजीराव कराडकर (वय २३, रा. उत्तम हाईट्स, अचानक चौकाजवळ, उत्तमनगर), भगवान बाबू मरगळे (वय २०, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरूड), कुलदीप हरीओम वाल्मीकी (वय २३, रा. ट्रिनिटी रेसिडेन्सी, उत्तमनगर), नीलेश अशोक देशमाने (वय २३, रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींचे यापूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. तसेच त्यांचे शिक्षणही फारसे झालेले नाही. कराडकर हा सोनार असून, वाल्मीकी याचे वडील सिम्बायोसिसमध्ये शिपाई आहेत, तर एकाचे वडील मंडप ठेकेदार आहेत. आरोपींनी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, हिंजवडीच्या हद्दीत तीन, चतु:शृंगीच्या हद्दीत एक असे सोनसाखळी चोरी तसेच हत्याराचा धाक दाखवत जबरी चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून या चौघांनी चोऱ्या करायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन दुचाकी, १० मोबाईल, दोन कोयते, दोन चाकू आणि ४ हजारांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त तुकाराम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, निरीक्षक (गुन्हे) एस. एस. खटके, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
पैलवान होण्यासाठी केल्या चोऱ्या
By admin | Updated: December 23, 2016 01:16 IST