जळगाव : दहशतवादी अजमल कसाबसंदर्भात बिर्याणीच्या मुद्यावरून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वातावरण निर्मितीसाठी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. कसाबला जाणून बुजून तर फाशी देण्यात आली नाही ना, असा समज त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असून निकम यांच्याकडून खुलासा मागविला जाईल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबने कारागृहात कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती़ त्याच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी, या हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा निकम यांनी शुक्रवारी जयपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केला होता़ कसाबने बिर्याणी मागितली नाही आणि शासनाने ती कधी पुरविली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते़ त्याबाबत बोलताना खडसे म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री आऱआऱ पाटील यांच्यासमवेत मी स्वत: कसाबची भेट घेतली आहे़ मात्र काही विषय जगासमोर ठेवण्यासारखे नाहीत़ परंतु निकम यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे असल्याचे खडसे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)च्निकम यांच्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
निकमांना बिर्याणी भोवणार
By admin | Updated: March 23, 2015 01:16 IST