मुंबई : अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यात ताडाची झाडेच नाहीत वा नावापुरतीच झाडे आहेत, अशा जिल्ह्यांतही ताडी विक्रीची दुकाने चालविली जातात. एक हजार ताडाच्या झाडामागे एक ताडीविक्रीचा परवाना देण्याचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला हरताळ फासत रसायनांचा वापर करून नकली ताडी विकली जात होती. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यातील विविध दुकानांमधील ताडीचे नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण करण्यात आले असता, अत्यंत विषारी, मानवी शरीराला घातक असे रासायनिक घटक मिसळून ताडी तयार केली जात असल्याचे आढळले. काही ठिकाणी मूळ ताडीचा पत्ताच नव्हता. केवळ रसायनांचाच वापर करण्यात येत होता. अशी जवळपास ६०० दुकाने असल्याचे समोर आले. राज्यात एकूण १ हजार २५० ताडीविक्रीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दिलेले आहेत. लिलाव पद्धतीने ते दिले जातात. ज्यांच्या परवाना क्षेत्रात ताडाची झाडेच नाहीत, अशा दुकानांवर गंडांतर येणार आहे.
राज्यातील ६०० ताडी दुकाने होणार बंद
By admin | Updated: November 11, 2016 05:35 IST