जळगाव : महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताला मोठा वाव आहे. शास्त्रीय संगीत ही आमच्या सारख्या कलाकारांची ओळख आहे. मात्र सर्वसामान्य रसिक हा शास्त्रीय संगीतापासून दूर जात आहे. विदेशातील गायकांकडून संगीत ऐकण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी शास्त्रीय संगीताला जतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांनी शुक्रवारी संध्याकाळी येथे केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार बेगम परवीन सुलताना यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पाच लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. बेगम परवीन सुलताना म्हणाल्या, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शास्त्रीय संगीताचा केलेला हा सन्मान आपल्यासाठी विशेष आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा माझा नाही तर ज्यांनी मला शक्ती दिली, आवाज दिला त्या वडिलांचा सन्मान आहे. चांगला गुरु मिळणे आणि गुरुला चांगला शिष्य मिळणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. मला चांगले गुरु दिले त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानत आपण त्यांना हा पुरस्कार अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कलाकार हा तयार होत नाही तर तो जन्म घेत असतो. त्यामुळे शास्त्रीय संगीतासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे. आपण जिद्दी व मेहनती होतो. कारण जोपर्यंत मेहनत करणार नाही तोपर्यंत परमेश्वर देखील आपल्याला काही देणार नाही हे आपण जाणून होतो. पती उस्ताद दिलशाद खान हे आपल्या पाठिशी उभे राहिल्यामुळे आपण उत्तम शास्त्रीय संगीतात पारंगत होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विदेशातील गायकांकडून संगीत ऐकण्याची वेळ येऊ नये
By admin | Updated: March 18, 2017 02:09 IST