बावडा : तालुक्याच्या लोकप्रतिनिधींमध्ये धमक नाही. तालुक्यातील दोन्ही नद्यांच्या पात्रात आज पाणी नाही. येथील जनता पाण्यासाठी विनवण्या करीत आहे; मात्र पाणी यायला तयार नाही. एकीकडे पाणी नाही, जनावरांना चारा नाही. शेतीला पाणी नसल्याने गावेच्या गावे ओसाड पडू लागली आहेत, अशा आक्रमक शब्दांत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांच्यावर टीका केली. बावडा (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत असताना पाटील म्हणाले, ‘‘तालुक्याची आजच्याइतकी दयनीय अवस्था कधीच झाली नव्हती. गेल्या दोन वर्षांत खडकवासला, भाटघर धरणांचे पाणी नाही. शेटफळ तलावात पाणी सोडता आले नाही. भीमा व नीरा नद्यांच्या पात्रांमध्ये इंदापूर तालुक्यापर्यंत पाणी यायलाच तयार नाही. नव्हे, ते आणण्याची ताकद लोकप्रतिनिधीमध्ये नाही. गेल्या ५० वर्षांत जे पाहिलं नाही ते पाहायची वेळ आली आहे. (वार्ताहर)
लोकप्रतिनिधींमध्ये धमक नाही : पाटील
By admin | Updated: July 31, 2016 01:20 IST