मुंबई : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशी आमदार दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवले. लेखी हमी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगत आमदारांनी उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळवण्यासाठी दहावीला १०० टक्के निकालाची जाचक अट लावण्यात आली होती. ती काढण्याची प्रमुख मागणी करत औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्यात ज्या शिक्षकांवर ३०७ कलम लावले, ते रद्द करण्याची मागणीही आमदारांनी केली होती. आमदारांच्या उपोषणाची दखल घेत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १०० टक्के निकालाची अट शिथिल करण्याचे आश्वासन दिले. मात्र लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले. आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले की, सकाळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र याआधी अनेकदा सरकारने आश्वासने दिले आहेत. त्यामुळे आत्ता निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. दरम्यान, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनीही उपोषणस्थळी भेट दिली. शिवाय शिक्षकांच्या लढाईला पाठिंबा घोषित केला. (प्रतिनिधी)
लेखी हमीशिवाय माघार नाही
By admin | Updated: October 19, 2016 02:09 IST