प्रशासनाने धरले नागरिकांना वेठीसभंडारा : जिल्ह्यात ढगफुटी होण्याच्या हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेमुळे बुधवारला जिल्ह्यातील वातावरण भयग्रस्त बनले होते. शाळांना सुटी देण्यात आली. रोवणीचा हंगाम सुरू असतानाही महिलांना रोवणीवर जाता आले नाही. परिणामी त्या घरीच होत्या. याचा धसका घेऊन नागरिकांनी रात्र जागून काढली. या समस्येचा सामना करता यावा, यासाठी प्रशासनाने शेकडो कर्मचाऱ्यांना रात्रपाळीत कर्तव्यावर ठेवले होते. सर्वजण रात्र जागून सज्ज होते. परंतु ढगफुटी तर सोडा, साधा रिमझीम पाऊसही बरसला नाही. ढगाळ आकाशाऐवजी जर आकाश पांढरे दिसत असेल तर ढगफुटी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शिक्षणाधिकाऱ्यांना ढगफुटीच्या सूचना देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद होत्या. परंतु तसे काहीही न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याविरुद्ध संताप पसरला होता. हवामान खात्याने ‘क्लाऊड ब्रस्ट’ असा इशारा दिला असला तरी भंडारा जिल्ह्यात तशी स्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा द्यायची गरज होती. परंतु ढगफुटीचा ईशारा दिला तर नागरिक भयभीत होतील, याचे भानही प्रशासनाने बाळगले नाही. हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्यातही असाच इशारा दिला होता. परंतु तेथील प्रशासनाने प्रशासकीय सतर्कता बाळगली होती. परंतु भंडारा जिल्हा प्रशासनाने ढगफुटीचा इशारा देऊन नागरिकांना अक्षरक्ष: वेठीस धरले. (जिल्हा प्रतिनिधी)
ढगफुटी सोडा पाऊसही नाही
By admin | Updated: August 7, 2014 00:55 IST