पुणे : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, पुढील तपासात आणखी काही गोष्टी निष्पन्न होतील. त्यामुळे याकडे वेगळ््या नजरेने बघण्याची गरज आहे. तपास यंत्रणेवर कोणताही राजकीय दबाव नाही. संपूर्ण तपास निष्पक्षपातीपणे व्हावा हीच सरकारची भूमिका आहे, असे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट केले.पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या सहकार्याने विशेष तपास पथकाने समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या पूर्णवेळ साधकाला अटक केली आहे. याविषयी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता गृह राज्यमंत्री शिंदे म्हणाले, की पानसरे हत्या प्रकरणात कोणत्या संस्थेचा हात आहे, हे आताच बोलता येणार नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. आरोपीला कोणतीही संस्था, जात, धर्म, पंथ नसतो. तपास पूर्ण झाल्यानंतर जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व काही जाहीर केले जाईल. या बाबी आताच उघड केल्या तर तपासाची दिशा बदलू शकते. तपासाची दिशा बदलणारी वक्तव्य कुणीही करू नयेत, असे आवाहनही प्रा. शिंंदे यांनी मित्रपक्षांसह विरोधी पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांना केले.
तपास यंत्रणेवर राजकीय दबाव नाही
By admin | Updated: September 24, 2015 01:29 IST