मुंबई, दि. ३० - अंधेरी पश्चिम येथील मेडिकल स्टोरला लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद स्थायी समिती व पालिकेच्या महासभेत उमटले़ या दुकानाला परवाना नव्हता, असे उजेडात आले आहे़. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरावरील गच्चीही बेकायदा असल्याचे समोर आले आहे़. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे़. दरम्यान, या दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा तहकूब करण्यात आल्या़. जुहू गल्लीतील दुमजली निगम मेस्त्री चाळीच्या तळमजल्यावर असलेल्या मेडिकल स्टोअरला आज सकाळी आग लागली होती़. या दुर्घटनेत नऊजण मृत्युमुखी पडल्याने सभा तहकूब करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली़. बेकायदा बांधकाम, सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि अरुंद गल्लयांमुळे बचावकार्यात अडथळा असे मुद्दे चर्चेत आले़.घरमालकाने हे दुकान भाड्याने दिले होते़. मात्र या मेडिकल स्टोअरला परवाना देण्यात आलेला नव्हता, असे शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकर यांनी निदर्शनास आणले़. या दुमजली घरावरील गच्चीही बेकायदा असल्याचे यावेळी सांगण्यात आले़. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़. या आगीची चौकशी करणार असल्याचे, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले़ पार्किंगमुळे बचावकार्यात अडथळाजुहू गल्ली येथील मेडिकल स्टोअरला लागलेल्या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने रवाना झाले़. मात्र त्या ठिकाणी अरुंद गल्लीमुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला़. त्यात भरीस म्हणून त्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमुळे आगीचे बंब पुढे जाऊ शकत नव्हत्या़. अखेर या वाहनांवरुन आगीचे बंब गेले़. त्यामुळे त्या वाहनांना आणि आगीच्या बंबाचे ही नुकसान झाल्याचे, रहांदळे यांनी सांगितले़.