मुंबई : महिला प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसी शिवनेरी बसमध्ये महिलांसाठी १० आसने आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तशी सूचना एसटीला केली. मात्र या सूचना करून एक महिना उलटला तरी शिवनेरीत महिला प्रवाशांसाठी १० आसने आरक्षित झाली नसल्याचे समोर आले आहे. प्रवासात महिला प्रवाशांची पुरुष प्रवाशांकडून काही वेळी होणारी छेडछाड तसेच विनयभंग पाहता परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काळ्या-पिवळ््या टॅक्सीत पुढील आसन महिला प्रवाशांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अशाच प्रकारे एसटीतही निर्णय घेऊ, असे त्यांनी वारंवार सांगितले होते. २0 जून रोजी रावते यांनी एसटीचे अध्यक्षपद स्वीकारताच त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन एसटीच्या एसी शिवनेरी बसमध्ये महिला प्रवाशांसाठी १० आसने आरक्षित ठेवत असल्याचे सांगितले. तशी सूचनाही एसटी महामंडळाला केली. एसटीत आता साध्या आणि हिरकणी बसेसमध्ये पाच आसने महिलांसाठी आरक्षित आहेत. मात्र शिवनेरी बसमध्ये महिलांसाठी आसने आरक्षित नव्हती. शिवनेरी बस मुंबई-पुणे,ठाणे-पुणेसह औरंगाबाद-पुणे आणि अन्य मार्गांवर धावत असून त्यामधून मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी प्रवास करतात. हे पाहता महिला प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते आणि त्यानुसार आसने आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र एक महिना उलटूनही परिवहन मंत्र्यांच्या सूचनांना एसटीच्या वाहतूक विभागाकडूनच विलंब केला जात असल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणीसाठी काही दिवस लागतील, असे महामंडळाकडूनच सांगण्यात आले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले असता, काही तांत्रिक समस्या असून त्या लवकरच सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. करंट बुकिंगमध्ये महिला प्रवाशांना आरक्षित आसने दोन ते तीन दिवसांत मिळतील. मात्र काही दिवस अगोदरच ‘त्या’ आसनांचे आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त होण्यास आणखी १० ते १२ दिवस लागतील, असे खंदारे यांनी सांगितले.
महिलांसाठी आरक्षित आसने अद्याप नाहीत
By admin | Updated: July 21, 2015 02:09 IST