सोलापूर : आमच्या आंदोलनामुळेच पाचशेचा दर अडीच हजार झाला. सर्व बाजूंनी शेतकरी भरडत असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.ऊस दर व अन्य शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा़ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर शेट्टी म्हणाले, मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरू आहे. आम्ही आजवर आंदोलनेच केल्यामुळेच साखर कारखानदारांना उसाला भाव द्यावा लागला आहे. दूध व उसाची परवड होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे साखर कारखानदारांना बंधनकारक आहे. दर न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांनी उलथून टाकले आहे. ही वेळ शिवसेना-भाजपाच्या सरकारवर येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तसेच साखर आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. एफआरपीची तोडफोड करून १५०० रुपयांचा दर देणे चुकीचे आहे. ऊस गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीनुसार विनाकपात उसाला दर देणे कायद्याने कारखानदारांवर बंधनकारक आहे. तसे होत नसल्यानेच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. आता कारखानदारांच्या दबावापुढे न झुकता कायद्याचे पालन शासनाने केले पाहिजे. तसे झाले नाही, तर आम्हाला सरकार सोबत राहण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला़
‘...तर सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू’
By admin | Updated: December 30, 2014 01:12 IST