पुणे : भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर आमची बाजू बरोबर आहे आणि आंदोलनकर्ते चुकीचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल तर त्यांनी या विधेयकाबाबत आमच्यासोबत जाहीरपणे चर्चा करावी आणि हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे कसे ते पटवून द्यावे, असे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पुण्यात दिले. भूमी अधिग्रहण विधेयक आणि त्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा, यावर चर्चा करण्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांतील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक गांधी भवनात घेण्यात आली. बैठकीनंतर ते बोलत होते. भूसंपादन विधेयकाबाबत सरकार बरोबर आणि आंदोलनकर्ते चुकीचे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर त्यांनी या विधेयकावर जाहीर चर्चा करावी़ प्रसारमाध्यमांद्वारे ही चर्चा सामान्य जनतेपर्यंत पोचायला हवी, म्हणजे दोघांचीही बाजू त्यांना कळेल आणि भूसंपादन विधेयक नेमके कोणाच्या हिताचे आहे, ते जनतेच्या लक्षात येईल.राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या या विधेयकाच्या अध्यादेशात केवळ शब्दांची फेरफार केली गेली, असा आरोप अण्णांनी केला. भूसंपादन विधेयकाविरोधात देशपातळीवर आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी या वेळी जाहीर केले. सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या आसपास हे आंदोलन होणार आहे. नवी दिल्लीत अण्णा आंदोलन करतील, याच वेळी प्रत्येक जिल्ह्यात, गावपातळीवरही आंदोलन करण्यात येईल. याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विनायक पाटील, विक्रांत पाटील, कमांडर नीती यांच्यासह १५ राज्यांतील शेतकरी संघटनांचे ६३ नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
...तर भूसंपादन विधेयकावर चर्चा करा
By admin | Updated: April 13, 2015 04:56 IST