मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सावातील मनमानीला चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. उत्सवादरम्यान आवाज प्रमाणापेक्षा वाढल्यास त्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर व ई-मेल आयडी तसेच रस्त्यावरील मंडप हटवण्यासाठी धोरण आखले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी ठाण्यात कमी आवाजात उत्सव साजरे होतील, अशी शक्यता आहे. न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सादर केले. आवाजाच्या तक्रारी आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या तक्रारींची स्वतंत्र नोंदवही देखील असणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र उत्सवांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी खंडपीठाने मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार? याचे प्रतिज्ञापत्र शुक्रवारीही मुख्य सचिव यांनी सादर केले नाही. अखेर न्यायालयाने यासाठी मुख्य सचिवांना येत्या ९ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ही शेवटी संधी दिली जात आहे, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले. उत्सवांमध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जाते. रस्त्यावर मंडप उभारले जातात. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याला निर्बंध घालणारे आदेश न्यायायलाने जारी करावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी केली आहे. याची दखल घेत न्यायालयाने मार्च महिन्यात याचे सविस्तर आदेश जारी केले.
उत्सवांच्या मनमानीविरुद्ध ठाण्यात मोर्चेबांधणी
By admin | Updated: July 4, 2015 03:19 IST