ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले. परंतु, ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी येण्यास विलंब होणार असल्याने ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सुमारे ५० ते ५२ टक्के सरासरी मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, सुमारे ३१ लाख १५ हजार (५२ टक्के) मतदारांनी मतदान करून १८ विधानसभा मतदारसंघांतील २३८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत ‘लॉक’ केले आहे. कोणाला किती मतदान झाले, याची उत्सुकता असली तरी १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत सर्वांना त्याची वाट पाहावी लागणार आहे. मतदानाच्या कालावधीतील भिवंडी, शहापूर तालुक्यांतील किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्ह्यातील सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदारांनी निर्भय वातावरणात बुधवारी मतदान केले़जिल्ह्यात सकाळी ७पासून सुरू झालेल्या मतदानात दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येक फेरीमध्ये दुपटीने वाढ होताना आढळून आली. यानंतर, मात्र ३ वाजेपर्यंतच्या चौथ्या फेरीत केवळ ७ टक्के वाढ होऊन जिल्ह्यात केवळ २८ टक्के मतदान झाले. दोन तासांनंतरच्या ५ वाजेपर्यंतच्या पाचव्या फेरीअखेर जिल्ह्यातील मतदानात १५ टक्के वाढ होऊन जिल्हाभरात ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदान झाले आहे.जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.७८ टक्के मतदान झाले. पहिल्या फेरीच्या या कालावधीत अंबरनाथ मतदारसंघात सर्वाधिक ९.९५ टक्के मतदान झाले असता ऐरोली मतदारसंघात सर्वात कमी ५.६६ टक्के मतदान झाले होते. ११वाजेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ११ टक्के मतदान झाले असता या कालावधीत भिवंडी पश्चिममध्ये १२.९५ टक्के सर्वात जास्त तर डोंबिवलीत १०.३४ टक्के सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय, १ वाजेच्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यात २१.१९ टक्के मतदान झाले. या दरम्यान ओवळा-माजिवडा या ठिकाणी २५.९४ टक्के मतदान सर्वात जास्त तर ऐरोलीमध्ये २०.२५ टक्के मतदान सर्वात कमी झाले. चौथ्या फेरीअखेर २८.३१ टक्के मतदान झाले असता भिवंडी पूर्व मतदारसंघात सर्वात जास्त ३६.३२ टक्के तर शहापूरमध्ये २६.१५ टक्के सर्वात कमी मतदान झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यात ५२ टक्के मतदान
By admin | Updated: October 16, 2014 05:08 IST