ठाणे : घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. ती बारावीत शिकत होती.ज्योती मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये एकटीच होती. बाल्कनीत टाकलेला टॉवेल घेण्यासाठी ती वाकली असताना पाय घसरल्याने ती खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा जबाब तिच्या आई आणि बहिणीने नोंदवला. याच जबाबानंतर चितळसर पोलिसांनी तिच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. दरम्यान, ती कोसळल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबानंतर तिचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले. अर्थात, अपघात की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे :२७व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:02 IST