ठाणे : अयोग्य कारणास्तव वाहनाच्या नुकसानीचा विमा प्रस्ताव नाकारणाऱ्या एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला असून ६१ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.भिवंडी येथे राहणारे लक्ष्मण पाटील यांनी आपल्या वाहनाची एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून सप्टेंबर २००९ ते २०१० या काळासाठी विमा पॉलिसी घेतली होती. २० सप्टेंबर २००९ रोजी अहमदाबाद हाय वेवरून जाताना त्या वाहनाला अपघात झाला. त्यात वाहनाचे सुमारे ७५ हजारांचे तसेच सामानाचे नुकसान झाले. पाटील यांनी अपघाताची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि नंतर इन्शुरन्स कंपनीकडे नुकसानभरपाईचा विमा प्रस्ताव दाखल केला. मात्र, वस्तुस्थितीची माहिती न दिल्याचे कारण सांगून कंपनीने तो प्रस्ताव नाकारला. त्यामुळे पाटील यांनी कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता पाटील यांनी इतर कंपनीचा नॉन क्लेम बोनस ४३९ रुपये इतकी कपात पूर्वीच्या पॉलिसीची खोटी प्रत दाखवून केली, असे इन्शुरन्स कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, कंपनीने त्याबाबतचा काही पुरावा दिलेला नाही. उलट, नुकसानीचा विमा प्रस्ताव आल्यावर सर्वेअरची नेमणूक करून वाहनाची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता कंपनीने पाटील यांना सदोष सेवा दिली आहे, असे मंचाने स्प्ष्ट केले. त्यामुळे गॅरेजने दिलेल्या दुरुस्ती अंदाजपत्रकानुसार पाटील यांना ६१ हजार नुकसानभरपाई ९ टक्के व्याजासह द्यावी, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
एचडीएफसी इर्गो इन्शुरन्सला ठाणे ग्राहक मंचाचा दणका
By admin | Updated: May 21, 2016 03:44 IST