मुंबई : उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे कामकाज सुरू असताना ठाकरे कुटुंबीयांनी पालिका सभागृहात प्रवेश करून विरोधकांचा रोष ओढवून घेतला़ मात्र विरोधी पक्षांचा आक्षेप डावलून नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेण्यात मश्गूल झाल्या़ यामुळे संतप्त विरोधकांनी जोरदार निदर्शने करीत निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला़ नियमाचा भंग झाल्यामुळे ही निवडणूक रद्द ठरविण्याची मागणीही विरोधी पक्षांनी लावून धरली आहे़महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पालिका मुख्यालयातील सभागृहात आज पार पडली़ या निवडणुकीत शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार स्नेहल आंबेकर यांना १२१ मते मिळाली़ त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ़ प्राजक्ता सावंत (६४ मते) यांचा पराभव केला़ स्नेहल आंबेकर या मुंबईच्या ७५व्या महापौर ठरल्या असून, त्या ७व्या महिला महापौर आहेत़ अनुसूचित जातीच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेत समाजवादी पक्ष व मनसेने भाग घेतला नाही़ उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व युवानेता आदित्य ठाकरे यांनी पुष्पगुच्छांसह सभागृहात प्रवेश केला़ ठाकरे कुटुंबीय सभागृहाचे सदस्य नसल्याने निवडणूक प्रक्रियेवेळी सभागृहात शिरणे बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला़ त्यामुळे गोंधळात प्रक्रिया उरकण्यात आली़ (प्रतिनिधी)
निवडणुकीत ठाकरेंचा व्यत्यय!
By admin | Updated: September 10, 2014 03:17 IST