अतुल कुलकर्णी, मुंबईआयएएस अधिकारीच जर मंत्र्यांकडे पाठ फिरवत असतील तर बाकी अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या अधिकारात बोलायचे, सभागृह चालू असताना देखील अधिकाऱ्यांच्या गॅलऱ्या रिकाम्या असतात यावरुन सध्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई एकही दिवस मंत्र्यांना भेटायला गेले नाहीत की त्यांच्या विभागाचे ब्रिफींगही त्यांनी केलेले नाही. अधिवेशन चालू असताना अनेक विभागांचे अधिकारी त्यांच्या विभागाचे विषय आले तरीही अधिकाऱ्यांसाठीच्या गॅलरीत येऊन बसत नाहीत. यावर दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विभागवार चर्चा होतात तेव्हा संपूर्ण राज्याचे चित्र आमदारांच्या बोलण्यातून उभे रहाते. त्याकडेच अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली तर राज्याच्या भावना त्यांना कळणार कशा? असेही वळसे म्हणाले होते.याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपण मुख्य सचिवांना याआधीच पत्र दिले होते. मात्र ही बाब सरकार गांभीर्याने घेईल. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गवई आणि झेंडे यांच्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गवई यांच्या कारभाराचे पुरावे तुम्हाला देतो,असेही मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. तर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नातेवाईक असल्यामुळे झेंडे यांची बदली म्हाडा चे उपाध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. शालेय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र त्यांनी या पदावर जाण्यास नकार दिल्याने आता तेथे नंदकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अधिका-यांनी फिरवली मंत्र्यांकडे पाठ!
By admin | Updated: April 6, 2015 23:22 IST