शासकीय तंत्रनिकेतन : शंभराव्या वर्षात संकेतस्थळावर जुनीच माहितीयोगेश पांडे - नागपूरउपराजधानीसोबतच मध्य भारतातील महत्त्वाची तंत्रनिकेतन संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले येथील अनेक माजी विद्यार्थी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट देऊन ‘अपडेट्स’ जाणून घेत आहेत. नुकतेच येथे पूर्णवेळ प्राचार्य रुजू झाले असले तरी संस्थेच्या संकेतस्थळावर माजी प्राचार्यांचाच उल्लेख दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान प्राचार्य नेमके कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.२०१३ सालापासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पूर्णवेळ प्राचार्यांचे पद रिक्त होते. त्याअगोदर डॉ.आर.एस.नायडू यांच्याकडे प्राचार्यपदाची जबाबदारी होती. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संस्थेला नुकतेच पूर्णवेळ प्राचार्य मिळाले. जिंतूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राचार्यपदावर नियुक्ती करण्यात आली . त्यांनी लागलीच पदभारदेखील सांभाळला.परंतु संस्थेच्या संकेतस्थळावर मात्र डॉ.थोरात यांचा कुठेही उल्लेख नाही. संस्थेचे कार्यकारी मंडळावरदेखील त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. अजूनही प्राचार्य म्हणून डॉ. नायडू यांचीच नोंद आहे.याशिवाय प्राचार्यांच्या संदेशाच्या ‘लिंक’मध्येदेखील डॉ.नायडू यांचाच संदेश दिसून येत आहे. संस्थेमध्ये स्थापनेचे शंभरावे वर्ष साजरे करण्यात येत आहेत. संस्थेतील जुन्या विद्यार्थ्यांसाठी ‘पॉलिटेकमित्र’ या नावाने ‘अॅल्युम्नी असोसिएशन’ची नोंदणी करण्यात आली आहे. निरनिराळ्या ‘सोशल नेटवर्किंग’ साईट्सच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली अन् अनेकांनी संकेतस्थळाला भेट देऊन ‘अपडेट्स’ घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संकेतस्थळावर जुनीच माहिती उपलब्ध असल्याचे काही जणांना लक्षात आले. अनेकांना तर डॉ.नायडू हेच विद्यमान प्राचार्य असल्याचे वाटत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संस्थेबद्दल चुकीचे ‘अपडेट्स’ जगापर्यंत पोहोचत आहेत. यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात राज्यातील नामवंत संस्थेचे संकेतस्थळ ‘अपडेट’ का नाही? इतके दिवस होऊनदेखील डॉ.नायडू यांचेच नाव संकेतस्थळावर कसे? डॉ.थोरात यांच्याबद्दल काहीही उल्लेख का नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यासंदर्भात नवनियुक्त प्राचार्य डॉ.थोरात यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सांगा तरी प्राचार्य नेमके कोण?
By admin | Updated: July 31, 2014 01:08 IST