औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाइलवर खेळत बसतात की व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुले प्रगत झाली पाहिजेत. ती शिकली पाहिजेत. आमची बांधिलकी गुरुजींसोबत नाही, ती मुलांसोबत आहे, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.मराठवाड्यातील केंद्रप्रमुखांसाठी आयोजित प्रेरणा कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी नंदकुमार हे शनिवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांतील मुले डिसेंबर २०१७ पर्यंत प्रगत झाली पाहिजेत, हा आमचा संकल्प आहे; परंतु औरंगाबादसह राज्यातील काही जिल्हा परिषद शिक्षकांचा विश्वास आहे की, आम्ही एक वर्ष अगोदरच (डिसेंबर २०१६) मुले प्रगत करून दाखवू. शिक्षकांवर कोणत्याही गोष्टीची सक्ती करण्यात आलेली नाही.जिल्हा परिषदेत शाळांतील मुलांना लिहिता येत नाही की वाचताही येत नाही, ही खासगी शाळांमार्फत पसरविलेली अफवा आहे, असे सांगून ते म्हणाले, आजही औरंगाबाद, अकोला, पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी नामांकित इंग्रजी शाळांतील मुले जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित होत आहेत. या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. सर्व गोष्टींना शिक्षकांनाच दोषी धरून चालणार नाही. आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही. आमची बांधिलकी विद्यार्थ्यांसोबत आहे. (प्रतिनिधी)
मुलांना शिकवा, मग मोबाइल गेम खेळा!
By admin | Updated: July 11, 2016 05:00 IST