मुंबई : माझगाव-ताडवाडीतील बीआयटी इमारतींत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे सर्व नागरी सोयीसुविधा असलेल्या संक्रमण शिबिरात पुनर्वसन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार भाडेकरूंचे आहे त्याच ठिकाणी चांगले संक्रमण शिबिर उभारून पुनर्वसन करा, आम्ही माहुलला जाणार नसल्याचे रहिवाशांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे इमारत खाली करण्यासाठी आलेल्या पालिका अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांच्या फौजफाट्याला अखेर माघारी परतावे लागले.माझगाव ताडवाडीत पालिकेच्या १६ बीआयटी चाळी असून, त्यापैकी १३, १४, १५ आणि १६ नंबरच्या इमारती धोकादायक जाहीर केल्या आहेत. यांपैकी १३ क्रमांकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. पालिकेने १०० रहिवाशांचे त्याच जागी बांधलेल्या संक्रमण शिबिरामध्ये पुनर्वसन केले आहे; तर उर्वरित २२० रहिवाशांना माहुलला हलवू असे सांगितले होते. मात्र त्यास भाडेकरूंनी विरोध केला होता.सोमवारी दुपारी अचानक कोणतीही नोटीस न देता इमारती खाली करण्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलीस आले होते; पण रहिवाशांनी इमारती खाली करणार नसल्याचे ठणकावल्याने त्यांनी नमते घेतले. पालिकेने माझगाव-ताडवाडीत संक्रमण शिबिर बांधून पुनर्वसन केले आहे. मात्र त्या रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही. शौचालयाची व्यवस्थाही नाही तसेच छताचे पत्रे तुटलेले आहेत. गटाराचीही व्यवस्था नाही. त्यामुळे अशा प्रकारे इतर रहिवाशांचेही स्थलांतर केले तर त्यांनी जगायचे कसे, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
ताडवाडी रहिवाशांचा माहुलला जाण्यास नकार
By admin | Updated: June 8, 2016 01:54 IST