मुंबई : नेहमी पुस्तकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये धडे शिकविण्याच्या पद्धतीला बाजूला सारून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जोगेश्वरीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘हायटेक’ क्लास घेतला. निमित्त होते जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचे. येथील बालविकास विद्यालय, श्रमिक विद्यालय, वासुदेव विद्यालयातील आठवीच्या १ हजार विद्यार्थ्यांना आदित्य यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले.माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीतून शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी टॅबचे मोफत वितरण करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे, असा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच आदित्य यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून टॅबचा वापर कसा करावा तसेच कुठल्या विषयाचा धडा कसा शोधावा? याचे प्रशिक्षणही दिले. शिवसेनेने शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले आहे. या टॅबचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी भविष्य अधिक उज्ज्वल बनवावे, असे मतही आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले. दरम्यान, या वेळी आमदार सुनील प्रभू, विभाग संघटक साधना माने, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, अनंतराव भोसले, जोगेश्वरी विधानसभा उपसंघटक रचना सावंत, स्थापत्य समिती अध्यक्ष अनंत नर, नगरसेविका शिवानी परब, नगरसेविका मंजिरी परब, नगरसेवक जितेंद्र वळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१ हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण
By admin | Updated: September 24, 2016 01:50 IST