मुंबई/ठाणे/पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे. आतापर्यंतची बळींची संख्या ५७८ झाली आहे तर लागण झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ८४५ वर पोहोचली आहे.१० ते १३ आॅगस्टमध्ये तब्बल १२५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १७ रुग्णांची प्रकृती अत्यव्यस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई, धुळे, पुणे, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई, रायगड, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे.२००९ मध्ये राज्यात अचाकनपणे स्वाइन फ्लूची साथ आली. त्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या वर्षात स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम होता. २०१३ व २०१४ मध्ये आजाराची तीव्रता कमी झाली होती. मात्र पुन्हा वर्षाच्या सुरुवातीला त्याने डोके वर काढले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या अवघ्या चार महिन्यांत राज्याच्या अनेक भागांत आजार फैलावला. त्यातून साडेपाच हजार नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि ५०० हून अधिक जणांचा बळी गेला. मे महिन्यात तापमानवाढीमुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठीचे पोषक वातावरण कमी झाले आणि आजाराचे रुग्ण घटले होते.दोन महिन्यांपासून पावसाळी वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ८ लाख ९९ हजार ३५८ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५९ हजार ५८३ संशयितांना औषध देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले
By admin | Updated: August 15, 2015 00:36 IST