ऑनलाइन लोकमत हैदराबाद, दि. १२ - स्वाइन फ्लू या संसर्ग आजारामुळे हैदराबादमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अधूनमधून जाणवणा-या स्वाइन फ्लूने देशभरात चांगलेच डोके वर काढले असून मुंबई, पुणे, गुजरात, राजस्थान आणि हैदराबादमधील अनेकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू ओढावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुरुवारचा दिवस ख-या अर्थाने स्वाइन फ्लू डे ठरला. गुरुवारी हैदराबादमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. हैदराबादमध्ये वर्षभरात स्वाइन फ्लूने बळी जाण्याची संख्या ५९ वर पोहाचली आहे. हैदराबादमधील गांधी हॉस्पिटलमध्ये चार जणांचा तर दोन जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी जोधपूरमध्ये एका ७० वर्षीय स्वित्झर्लंड महिला पर्यटकाचा स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला. देशाच्या अनेक भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मुंबईत एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे. राजस्थानच्या ३३ जिल्हयात याची लागण झाली आहे. १४०४ लोकांना तपासणी केल्यानंतर लागण झाल्याचे निष्पन्न झाले. १ जानेवारीपर्यंत ११७ जणांचा बळी गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जयपूरमध्ये २१, अजमेर १९, बारमार ११, नागौर ०९, जोधपूर ०८, चितौडगड ०७, बानसवारा ०६, कोटा ०५, बिकानेर आणि टोंक प्रत्येकी ०४, सिकार आणि भिलवाडा प्रत्येकी ०३, डौसा, झूनझूनू, पाली, बुंदी आणि उदयपूर प्रत्येकी २, तर भारतपूर, चुरु, जैसलमेर, श्रीगंगांर, हनुमानगड, डुंगरपूर आणि अल्वर येथे प्रत्येकी एकचा बळी गेल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
स्वाइन फ्लूचे थैमान : हैदराबादमध्ये एकाच दिवशी ६ जणांचा मृत्यू
By admin | Updated: February 12, 2015 20:57 IST