शिवाजी गोरे,
पुणे- भोपाळ येथे होणाऱ्या जागतिक शालेय जलतरण अजिंक्यपद निवड चाचणीची माहिती वेळेत न दिल्यामुळे राज्यातील जलतरणपटूंची संधी पाण्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात जलतरण वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तुर्की येथील त्राबझॉन येथे ११ ते १८ जुलेदरम्यान जागतिक शालेय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी देशपातळीवर भोपाळ येथील राजीव गांधी जलतरण तलावावर ७ व ८ जून रोजी निवड चाचणी घेण्यात येईल. या निवड चाचणीसाठी पुण्यातून ११ मुंबई शहर व उपनगर मिळून १०, नाशिक १ व ठाणे आणि कोल्हापूर प्रत्येकी २ असे जलतरणपटूंची निवड झाली आहे. या संदर्भातील पत्र स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाकडून (एसजीएफआय) क्रीडा विभागाला २० मे रोजी एसजीएफआय/१८०९ या क्रमांकाने पाठविण्यात आले होते. क्रीडा विभागाने या चाचणीची माहिती राज्यातील निवड झालेल्या जलतरणपटूंना पत्र मिळाल्यानंतर लगेच देणे गरजेचे होते; परंतु क्रीडा विभागाच्या वतीने या संदर्भातील पत्र ६ जून रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठविले. जेव्हा हा मेल संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पाहिला, तेव्हा त्यांची पळापळ सुरू झाली. संबंधित जलतरणपटूंना फोन करून बोलावून घेऊन त्यांना निवड चाचणीची माहिती देण्यात आली. मात्र, ऐन वेळी मिळालेल्या माहितीमुळे जलतरणपटूंसह त्यांच्या पालकांची त्रेधा उडाली. काही पालकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून क्रीडा खात्याच्या भोंगळ कारभाराची माहिती देऊन आपला संताप व्यक्त केला. या संदर्भात क्रीडामंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. >रविवारी मी पुण्यात येत असताना डिएसओकडून मला दुपारी २.३० वाजता फोन आला. जलतरणपटू एवढ्या कमी वेळात भोपाळला घेवून जाण्याचे नियोजन कसे करणार. दोन दिवस आधी कळाले असते तर तेथे जावून तलावाची माहिती घेता आली असती. आता रात्रभर प्रवास करून सकाळी जलतरणपटू निवड चाचणीसाठी उतरणार. दिलेल्या वेळेत जर काही कमी जास्त झाले तर त्यांची मेहनत वाया जाणार. याला जबाबदार कोण? ते खडतर मेहनत करीत असतात. पण क्रीडा खात्याकडूनच अशी वागणूक मिळत असेल तर खेळाडू कसे निर्माण होणार? - मनोज एरंडे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते>या खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. भोपाळ येथील संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे झाले आहे. महाराष्ट्रातील जलतरणपटूंना कोणताही त्रास होणार नाही.- सुधीर मोरे, सहायक संचालक, क्रीडा विभाग