मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याची निवड आणि शपथविधीची औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच महसूल, गृह यासारख्या खात्यांवरून भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेने अर्थ खाते व विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याने उभय पक्षांमधील चर्चेचे चाक रुतले आहे. आता या वादात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच हस्तक्षेप करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.मुख्यमंत्री पदाकरिता देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत येताच नितीन गडकरी, विनोद तावडे, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे या इच्छुकांनी व त्यातील काहींच्या समर्थकांनी उलटसुलट विधाने करून आपणही शर्यतीत असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात गडकरी वगळता बाकीच्यांचे हे दावे आपल्याला मनपसंत खाती मिळावी याकरिता होते, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी रविवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाची रचना व खातेवाटप याबाबत चर्चा झाल्याचे समजते. सरकारमधील महसूल या महत्त्वाच्या खात्यावर गिरीश बापट आणि एकनाथ खडसे या दोघांनी दावा केल्याचे समजते. मागील युतीच्या सरकारमध्ये खडसे यांच्याकडे अर्थ व सिंचन ही खाती होती. आता ज्येष्ठतेनुसार महसूल खाते मिळावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. बापट यांनीही महसूल खात्याकरिता आग्रह धरला आहे. विनोद तावडे यांनी अत्यंत खुबीने प्रचाराच्या काळातच आपण गृहमंत्री होणार, अशी घोषणा केली होती. तावडे यांना हे खाते देण्यास खुद्द फडणवीस उत्सुक नसल्याचे कळते. पक्षातील काही नेत्यांनी आणि सरकारला उत्स्फूर्तपणे बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तावडे यांच्याकडे गृह खाते जाऊ नये, याकरिता प्रयत्न चालवले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
शपथविधीपूर्वीच रस्सीखेच
By admin | Updated: October 27, 2014 02:52 IST