ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपाने ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजपाने महाराष्ट्रात अल्पमतातील सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. उद्या (मंगळवारी) भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाल्यावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. शेलार व अन्य भाजपा नेत्यांनी सोमवारी वानखेडे स्टेडियमचा दौरा करुन आढावाही घेतला. हा सोहळा ऐतिहासिक व्हावा व सर्वसामान्यांना या सोहळ्याचे साक्षीदार होता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही शेलार यांनी सांगितले.
यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार होता. मात्र यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने ते मुंबईला येऊ शकले नसते. यामुळेच आता ३१ ऑक्टोबररोजी शपथविधी सोहळा घेण्याचे ठरले. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यावर निलोफर या वादळाचे सावट पसरले आहे. अरबी समुद्रातील निलोफरमुळे किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.