मुंबई : गिरणी कामगारांसाठीच्या घरांमध्ये स्वान मिलच्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेवरुन निर्माण होणार गुंता सोडविण्यासाठी म्हाडाने आता नवी शक्कल लढविली आहे. या मिलच्या तीन वेगवेगळ्या युनिटप्रमाणे त्यांची नोंदणी स्वतंत्रपणे केली जाणार आहे. त्यासाठी ‘स्वान’च्या ३९२० कामगारांना आवाहन करण्यात आलेले असून ३० सप्टेंबरपर्यत आपली माहिती म्हाडाच्या कार्यालयात द्यावयाची आहे. गिरणी कामगारांसाठीच्या दुसऱ्या टप्यातील घरे बांधण्याचे काम सुरु असून कामगारांच्या नोंदणीचे संकलन करण्यात येत आहे. त्यामध्ये स्वान मिलचे,शिवडी-५७, स्वान मिल-५७-ए स्वान मिल ज्युबली/प्रोसेसिंग हाऊस-५७बी असे अर्जामध्ये विकल्प बनविण्यात आले आहेत. नव्या बांधकामामध्ये स्वान मिलच्या ज्युबली ५७ बी येथील जागेचा समावेश असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्यातील सोडतीमध्ये ५३६ कामगारांना घरांचा ताबा मिळाला आहे.स्वान मिलचे शिवडी, कुर्ला व ज्युबिली / प्रोसेसिंग हाऊस अशी तीन स्वतंत्र युनिटे होती. त्यामध्ये एकुण ३९२० कामगार असल्याची नोंदणी आहे. मात्र दोन वर्षापूर्वी म्हाडाने गिरणी कामगारांसाठी साडेसहा हजार घराची लॉटरी काढली असताना त्यामध्ये शिवडी व कुर्ला या युनिटच्या जागेचा समावेश असल्याने त्याच ठिकाणी काम केलेले कामगार लॉटरीसाठी पात्र असताना म्हाडाकडून सुरवातीला त्याबाबत जाहिरातीमध्ये निश्चित स्पष्टता न करता केवळ योजनेचा संकेत क्रं.५७ दिला होता. त्यामुळे ज्युबिली व प्रोसेसिंग हाऊस येथील युनिटमध्ये काम केलेल्यांनी अर्ज करुन त्यातील १५० विजेते ठरले. त्यांच्या अर्जाच्या छाननीमध्येही बाब उघड झाल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण होवून त्याविरुद्ध संघटनांकडून आंदोलन करण्यात आली. मुख्यमंत्र्यांशी वारंवार चर्चा करुनही गुंता मिटविता आला नाही.(प्रतिनिधी)
स्वान मिल कामगारांची नोंदणी स्वतंत्रपणे
By admin | Updated: August 18, 2014 03:56 IST