राजा माने, सोलापूरमहायुतीच्या जागावाटपात राज्यातील प्रत्येक विभागात विधानसभेच्या जागा आपल्या वाट्याला याव्यात, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, शाहूवाडी, सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा तर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या मतदारसंघांसाठी महायुतीच्या नेत्यांवर विशेष दबाव टाकला जात आहे.पश्चिम महाराष्ट्र हे विशेष प्रभावक्षेत्र असलेल्या ‘स्वाभिमानी’ने महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील आपला गेम प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार महायुतीतील भाजपा व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अधिकाराच्या जागांपैकी कोणाकडून किती जागांचा वाटा घ्यायचा, याचीही योजना आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, कोरेगाव, दक्षिण कऱ्हाड, कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवा, पलूस-कडेगाव, सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, उस्मानाबाद जिल्ह्यात भूम-परांडा, तर विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व अकोल्यातील बाळापूर या मतदारसंघांवर संघटना दावा करणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानीला अधिक वाटा देण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यानुसार संघटनेला मिळणाऱ्या किमान १२ जागांपैकी शिवसेनेच्या कोट्यातील ७ तर भाजपाच्या कोट्यातील ५ जागांचा समावेश आहे. भाजपानेही अधिक वाटा द्याव्यात, असा प्रयत्न संघटनेचे नेते करताना दिसतात.
‘स्वाभिमानी’चा विभागवार वाट्यासाठी आग्रह!
By admin | Updated: September 12, 2014 02:22 IST