ठाणे : इफेड्रिनप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुंबई, कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या सुमारे १०१ नमुन्यांपैकी ४३ नमुन्यांच्या अहवालात ते अमलीपदार्थ असल्याचे समोर आले आहे. त्याची तीव्रता ८० ते ९९ टक्के असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली. यापासून ब्राऊन शुगर, हेरॉइन, कोकेन आदी ड्रग्ज तयार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.सोलापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत ठाणे पोलिसांनी छापा टाकून २ हजार कोटींचे इफेड्रिन पकडल्यावर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. पोलिसांनी हस्तगत केलेल्या इफेड्रिनचे नमुने कलिना येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल ठाणे पोलिसांना नुकताच मिळाला आहे. इफेड्रिनच्या ४३ नमुन्यांमध्ये अमलीपदार्थांची तीव्रता ८० ते ९९ टक्के असल्याचे आढळले आहे. यावरून इफेड्रिनवर प्रक्रिया करून त्याद्वारे ब्राऊन शुगर, हेरॉइन, कोकेन आदी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे पुढे आले आहे. याचदरम्यान, २ हजार कोटींच्या इफेड्रिनप्रकरणी ट्रकचालक बाबा धोत्रे याला मुंबई, वांद्रे येथून अटक केल्याने आरोपींची संख्या ९ झाली आहे. त्याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धोत्रे हा पुनीतच्या मदतीने अमलीपदार्थाची वाहतूक करीत असे. तो आपल्या ट्रकमधून वाहतूक करायचा तसेच इफेड्रिनने भरलेला ट्रक तो अज्ञातस्थळी लपवूनही ठेवत असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
इफेड्रिनपासून ब्राऊन शुगर बनवल्याचा संशय
By admin | Updated: May 21, 2016 06:01 IST