मुंबई : अचानक राजकारणात अधिक रस घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याची खा. सुप्रिया सुळे यांची धडपड सुरू आहे, पण त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याऐवजी त्यांच्या स्पर्धकांवर टीका करावी, असा उपरोधिक सल्ला प्रदेश भाजपाने दिला. खा. सुळे यांनी सध्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले असून ‘कारभार करता येत नसेल तर पद सोडा’ असे आव्हानदेखील दिले आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वासाठीचे ‘प्रॉक्सी वॉर’ आहे. अशा रीतीने मुख्यमंत्र्यांवर वार करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षांतर्गत स्पर्धकांवर थेट हल्ला करावा. त्यांनी त्यांच्या खऱ्या टार्गेटवर हल्ला केला तर त्यांच्या हाती काही तरी लागेल आणि विनाकारण संभ्रम निर्माण होणार नाही, अशी कोपरखळी भाजपाने मारली.सत्ता हातची गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये निराशा आली. त्यातच त्यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्यानंतर पक्ष हादरला. अशा स्थितीत पक्षाची घडी विस्कळीत होत असताना पक्षसंघटना ताब्यात घेण्यासाठीचा संघर्ष राष्ट्रवादीमध्ये उफाळला असल्याचा टोलाही भांडारी यांनी हाणला आहे. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादी ताब्यात घेण्याची सुप्रियांची धडपड
By admin | Updated: October 8, 2016 04:30 IST