तासगाव (सांगली) : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या प्रचारसभेत भाषण संपवत असताना मंगळवारी खा. सुप्रिया सुळे अचानक चक्कर येऊन व्यासपीठावर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र सुळे यांनी थोडा वेळ विश्रांती घेत पुन्हा महिलांशी संवाद साधला.सभेपूर्वी त्यांनी काहीही खाल्लेले नव्हते. तसेच ऊन व प्रवासामुळे त्यांना चक्कर आली असावी, असा अंदाज आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. प्रकृती व्यवस्थित असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर महिला कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी दुपारचे जेवण केले व नंतर त्या कवठेमहांकाळकडे रवाना झाल्या. महिला मेळाव्यात भाषण करताना दुपारी साधारण दोन-सव्वा दोन वाजेच्या दरम्यान सुमनतार्इंना निवडून देण्याचे त्या हात जोडून आवाहन करीत असताना अचानक त्यांना चक्कर आली. तोल गेल्यामुळे त्यांनी डायसचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या चक्कर येऊन पडल्या. सभागृहात पुढील बाजूस महिला कार्यकर्त्या बसल्या होत्या, तर मागील बाजूस पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उभे होते. त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. काही वेळानंतर सुप्रिया सुळे स्वत:च उठून बसल्या. त्यानंतर त्यांनी उर्वरित भाषण पूर्ण केले. (वार्ताहर)
सुप्रिया सुळेंना प्रचारसभेत भोवळ
By admin | Updated: April 8, 2015 01:38 IST