गंगाजमुनात तणाव : पोलिसांचा हस्तक्षेपनागपूर : समर्थक आणि विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे गंगाजमुना परिसरात आज दुपारी तणाव निर्माण झाला. पोलिसांचा हस्तक्षेप अन् दोन्हीकडील काही मंडळींनी समंजसपणा दाखवल्यामुळे पुढील अप्रिय घटना टळली.पोलिसांच्या कडक कारवाईमुळे गेल्या तीन आठवड्यांपासून गंगाजमुना वस्तीत वेश्याव्यवसाय बंद आहे. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त वारांगना येथून पळून गेल्या आहेत. उर्वरित वारांगनांनी उदरनिर्वाह आणि पुनर्वसनाचा मुद्दा पुढे करून येथेच ठाण मांडले आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज दुपारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जांबुवंतराव धोटे, नूतन रेवतकर, अरुणा सबाने, नयना धवड, मधुकर कुकडे तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. चौबे यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे ते वगळता इतर मंडळी गंगाजमुना वस्तीत गेली. तेथे वारांगनांची बैठक घेण्यात आली. तृतीयपंथीही यावेळी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. ‘आमची उपासमार होत आहे. आवश्यक चीजवस्तू घेण्यासाठी आम्हाला पोलीस बाहेर जाऊ देत नाही’, असे सांगून वारांगनांनी उपस्थितांसमोर रोष व्यक्त केला. तसेच वारांगनांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. याच वेळी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे आणि गंगाजमुना हटाव कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत रस्त्याच्या पलीकडे आले. त्यांनी वेश्या वस्ती हटावच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे वारांगना आणि त्यांचे समर्थन करणारी मंडळी संतापली. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्हीकडील मंडळींना समजावले. स्थानिक नेत्यांनी समंजसपणा दाखविल्यामुळे अप्रिय प्रसंग टळला. (प्रतिनिधी)दंडा अन् दिलगिरी तणाव निवळल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष नूतन रेवतकर या आपली दुचाकी काढत असताना एका पोलिसाने दंडा आपटून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे वातावरण तापले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केल्यामुळे प्रकरण निवळले.
समर्थक आणि विरोधकांची घोषणाबाजी
By admin | Updated: February 6, 2015 00:58 IST