मुंबई : लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबाबत अपमानास्पद केलेल्या वक्तव्याबाबत भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवारी राज्य महिला आयोगाकडे वकीलामार्फत माफीनामा सादर केला. मात्र त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे.गेल्या आठवड्यात निवडणूक प्रचारावेळी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भाजपा उमेदवारांचा प्रचार करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राज्य महिला आयोगाने याबाबत त्यांना नोटीस बजाविली होती. त्यानुसार मंगळवारी अकरा वाजता परिचारक यांच्यावतीने त्याचे वकील अॅड. सारंग आराध्ये हे आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासमोर सुनावणीला हजर झाले. या प्रकरणाबाबत परिचारक यांनी यापूर्वी जाहीर माफी मागितली आहे. तरीही आयोगासमोर पुन्हा लेखी माफी मागण्यास तयार असल्याचा खुलासा केला. मात्र त्यासंबंधीचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणे आवश्यक असल्याचे रहाटकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणले. त्यालाही अॅड. आराध्ये यांनी तयारी दर्शविली. (प्रतिनिधी)>पुढील सुनावणी ६ मार्चलायाबाबत पुढील सुनावणी ६ मार्चला ठेवण्यात आली असून त्यांनी विहित नमुन्यामध्ये खुलासा सादर केल्यानंतर पुुढील निर्णय घेतला जाईल, असे आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी सांगितले.
परिचारकांचा वकिलामार्फत माफीनामा
By admin | Updated: March 1, 2017 05:17 IST