ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरुन देशभरातील राजकारण तापत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या पावलाचे स्वागत केले आहे. आपल्याकडे किती शक्ती आहे हे ती दाखविल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे शक्ती दाखविणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आज जग आपल्यासोबत उभे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.नागपुरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कोणतीही गोष्टी शक्तीशिवाय चालत नाही. शक्तीचा ईकार नसला तर शिवाचे शव होऊन जाते. सगळ्या चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे शक्ती हवी. चांगल्या गोष्टी जगात स्थापित व्हायच्या असतील, तर नुसत्या चांगल्यापणाला कुणीच विचारत नाही. शक्ती दाखविणे आवश्यक असते.
आतापर्यंत देशाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. जर असा प्रयत्न केला तर अमेरिकेकडून शांत रहा अशी सूचना यायची. आता आपण न विचारता आपली शक्ती दाखवून दिली. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला उपदेश करणारे देश आपल्या पाठीशी उभे आहेत, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.