पुसद (जि. यवतमाळ) : जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता पुसद येथे निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. शनिवारी गहुली येथील सुधाकरराव नाईक यांच्या समाधीनजीक शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.सर्वोदयी विचाराचा प्रभाव असलेल्या सुमनताई या बंजारा समाजातील जुन्या पिढीतील समाजसुधारक बळीराम पाटील (मांडवी) यांच्या कन्या होत्या. त्यांचे शिक्षण वर्धा येथे झाले. सुधाकरराव नाईक यांच्याशी त्यांचा विवाह ९ सप्टेंबर १९५९ रोजी झाला होता. सुधाकरराव नाईक यांच्यामुळे त्यांना साहित्य व ललित कलेची गोडी लागली होती. गेल्या वर्षभरापासून त्या हृदयाच्या आजाराने पीडित होत्या. मुंबई येथील लिलावती व हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उपचाराचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांना पुसद येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता हृदयविकाराचे दोन तीव्र झटके आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुसद येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गहुली येथील सुधाकरराव नाईक यांच्या समाधीनजीक पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, अर्चना यशवंत चव्हाण, आराधना अशोक नाईक या दोन विवाहित कन्या आहे. अंत्यसंस्कारप्रसंगी नाईक परिवारातील ज्येष्ठ आमदार मनोहरराव नाईक यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार संजय राठोड, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संदीप बाजोरिया, आमदार प्रदीप नाईक, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार डॉ.एन.पी. हिराणी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सुमनताई नाईक यांचे निधन
By admin | Updated: October 26, 2014 00:16 IST