मुंबई: मित्राने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला नकार दिल्याने वर्सोव्यात एका तरुणीने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपविले. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. अंबोली पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.करमजीत कौर उर्फ नेहा (२७) असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती वर्सोवा परिसरात असलेल्या सहयोग नगरमधील सहजीवन इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होती. ही खोली तिचा लिव्ह इन जोडीदार जितेंद्र सिंग (२३) याने सहा महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा सिंग हा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करतो, तर नेहा दिल्लीची असून तिनेदेखील काही दिवस मॉडेलिंगसाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यात जम न बसल्याने अखेर तिने खासगी नोकरीचा पर्याय निवडला. मधल्या काळात दोघांची मैत्री झाली आणि ते दोघे एकत्र राहू लागले. मात्र, काही दिवसांनंतर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे नेहासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय सिंगने घेतला आणि त्याबाबत फेब्रुवारी महिन्यात त्याने तिला हे स्पष्टपणे सांगितले. तेव्हा रागाच्या भरात ती दिल्लीला निघून गेली. मात्र, रमजानच्या एक दिवस आधी ती मुंबईला परतली आणि तिने सिंगकडे नाते न संपविण्याची विनंती केली. मात्र, नेहमीच्या भांडणांना कंटाळलेल्या सिंगने तिला पुन्हा नकार दिला. त्यामुळे तिने गळफास घेऊन आयुष्य संपविले. ‘आम्हाला घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणी आम्ही सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, तसेच तिच्या दिल्लीतील नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले आहे. ते लवकरच मुंबईत दाखल होतील,’ अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सध्या आम्ही सिंगची चौकशी करत आहोत, असेही हजारे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)काय घडले ‘त्या’ रात्री?नेहा ही मंगळवारी रात्रीपासूनच भरपूर दारू प्यायली होती. दारूच्या नशेत ‘मला एक संधी दे, नाते तोडू नको,’ असे ती वारंवार सिंगला सांगत होती. मात्र, त्याने तिला सपशेल नकार दिला. त्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रमंडळींनीदेखील तिची समजूत काढली. बुधवारी दुपारी पुन्हा नेहाने स्वत:ची बॅग भरली आणि ती घराबाहेर निघून गेली. मात्र, सायंकाळी ती परतली आणि तिने सिंगलाच मारहाण करत ‘गेट आउट’ म्हणत घरातून हाकलून दिल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिंग मित्राकडे निघून गेला. त्यानंतर, साडेदहाच्या सुमारास त्याच्या अन्य एका मित्राला फोन करून सिंगने नेहाची चौकशी करण्यास पाठविले. तो मित्र घरी पोहोचला. त्याने बऱ्याचदा घराची बेल वाजवली. मात्र, नेहाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याबाबत कळविले. त्यानुसार, पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिला, तेव्हा घराच्या बेडरूममधील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत नेहा त्यांना दिसली आणि हा प्रकार उघड झाला.
‘लिव्ह इन’ला नकार दिल्याने आत्महत्या
By admin | Updated: July 15, 2016 01:45 IST