कोल्हापूर : केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. गत आठवड्यापेक्षा प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी दर खाली आले असून त्याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाच्या सुरुवातीला दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होता. काही कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी उचल हवी असल्याने त्यांनी साखरेची विक्री केली. व्यापाऱ्यांनी ही साखर गोडावूनमध्ये ठेवली. एप्रिल-मेमध्ये साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने दर तेजीत असतो. या तेजीचा फायदा उचलण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेली चार महिने गोडावूनमध्ये साखर साठवून ठेवली. त्या रकमेवरील व्याज व गोडावून भाडे हे जरी प्रतिक्विंटल दोनशे रुपये गेले तरी एप्रिल-मे महिन्यात ३५०० रुपयांपर्यंत साखर विकली जाणार, हे व्यापाऱ्यांचे गणित होते. मध्यंतरी साखरेच्या दराने एकदम उचल खाल्याने दर ३८०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यातच एप्रिल-मेनंतर साखर पन्नाशी ओलांडणार, असे भाकीत झाल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले. तुरडाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर संपूर्ण देशात हाहा:कार माजला होता. डाळींचे दर नियंत्रणात आणताना सरकारच्या तोंडाला फेस आला. आता पुन्हा डाळीचे दर वाढू लागले आहेत. त्यातच साखरेने जर पन्नाशी ओलांडली तर सरकार अडचणीत येऊ शकते. या भीतीपोटी केंद्राने साठेबाजांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आणि व्यापारी खडबडून जागे झाले. गेल्या दोन दिवसांत घाईगडबडीने हजारो टन साखर बाजारात आल्याने दर प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी घसरला आहे. उर्वरित एफआरपी देण्यावरून साखर कारखान्यांवर सरकार सातत्याने दबाव टाकत आहे. साखरेचे दर वाढल्याने साखर बाजारात काढण्याची तयारी कारखानदारांनी केली होती. साखरेची विक्री करून उर्वरित एफआरपी देण्याचे नियोजन सुरू असताना दर घसरल्याने कारखानदारांसमोरही पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) > कारखान्यांवरील कारवाईचाही परिणामउर्वरित एफआरपी दिली नाही तर साखर कारखान्यांची गोदामे ताब्यात घेऊ, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. तर थेट साखर साठे जप्त करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. सतत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या वक्तव्यांचा परिणाम साखर दरावर होत असल्याचा आरोप साखर कारखानदारांमधून होत आहे.
साखरेचे दर गडगडले
By admin | Updated: April 30, 2016 01:48 IST