मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देता यावा यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन अनुदान म्हणून टनाला १ हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यावर राज्य सरकार आग्रही आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने याआधीच उसावरील खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मळी नियंत्रणमुक्त करण्यासंदर्भातही राज्याने निर्णय घेतला आहे. साखरेचा बफर स्टॉक करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. जेणेकरून अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा मिळेल. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २० टक्के अंतरिम वाढ करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. तसेच विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा विचार सुरू आहे. आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. मात्र, याचा लाभ केवळ व्यापाऱ्यांनाच झाल्याचे निदर्शनाला आले आहे. यामध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांना द्यायच्या मदतीबाबत विचाराअंती योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)
साखर उद्योगाला दोन हजार कोटींचे पॅकेज
By admin | Updated: April 11, 2015 02:27 IST