मुंबई : आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुळकर्णी पुढील आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. मुंबईहून शनिवारी ते कराचीला रवाना होतील. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या ‘नायदर अ व्हॉक नॉर अ डव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन कराचीत कुळकर्णी यांच्या हस्ते २ नोव्हेंबरला करण्यात येईल.या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी कसुरींनी कुळकर्णींना आमंत्रण दिले होते. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. मागील पंधरवड्यात कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेने विरोध केला होता. या विरोधानंतरही सुधींद्र कुळकर्णी यांनी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पाडला होता. मात्र, त्या सकाळी शिवसैनिकांनी कुळकर्णी यांच्या चेहऱ्यावर शाई टाकली होती. अशा परिस्थितीतही कसुरींचा कार्यक्रम घेतल्याने कुलकर्णी यांच्या धाडसाचे कौतुक झाले होते. पुस्तक प्रकाशनानंतर कुळकर्णी पाकिस्तानात चार दिवस राहणार आहेत. यादरम्यान, ते विविध ठिकाणांना व शहरांना भेटी देणार आहेत. (प्रतिनिधी)
सुधींद्र कुळकर्णी पाक दौऱ्यावर जाणार
By admin | Updated: October 31, 2015 01:42 IST