प्रकरण कार नदीत बुडाल्याचे : चार दिवस चालले शोधकार्यभंडारा : चार दिवसांपूर्वी नदीत कोसळलेली इंडिका कार शुक्रवारी १५ आॅगस्ट रोजी दुपारी गोताखोरांना गवसली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचेही मृतदेह मिळाले असून सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांती रेतीत फसलेली कार काढण्यात केंद्रीय आपत्ती निवारण पथकाला यश आले.अजय भादुडी (३८) रा.भंडारा, विक्रांत वैद्य (४०) रा.नागपूर, राहुल पितळे (४१) रा.नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. रात्री उशिरा भादुडी आणि वैद्य यांच्या पार्थिवावर भंडारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर पितळे कुटुंबीयांनी राहुल यांच्या पार्थिवावर नागपूर येथे अंत्यसंस्कार केले.मंगळवार दि. १२ आॅगस्ट रोजी दुपारी विक्रांत वैद्य, राहुल पितळे आणि अजय भादुडी हे तिघे नागपूरहून भंडारा येथे काही कामानिमित्त आले होते. दुसऱ्या दिवशी गोंदियाला जायचे असल्यामुळे नदी पुलाच्या पलिकडे असलेल्या सालेबर्डी गावात मजुरांना भेटण्यासाठी ते गेले होते. तेथून परतताना कार चालवित असलेले पितळे यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्यामुळे कार नदीत कोसळली. तेव्हापासून ते तिघेही बेपत्ता होते.तिसऱ्या दिवशी नागपूर महानगर पालिकेच्या आपत्ती निवारण पथकाला बोलविण्यात आले. त्यांनी १२ तास बेपत्ता कारचा शोध घेतला परंतु कार सापडली नाही. दरम्यान शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शोध कार्य सुरू असताना स्थानिक मासेमारांना कार गवसली.सहा तासांचे अथक प्रयत्नदुपारी २ वाजताच्या सुमारास अजय भादुडी यांचा मृतदेह घटनास्थळापासून १४ कि.मी. अंतरावरील अर्जुनीजवळ आढळला. त्यानंतर काही वेळातच वैद्य यांचा मृतदेह ११ कि.मी. अंतरावरील मकरधोकडा नदी काठावर दिसला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने नदीत रेतीत फसून असलेली कार काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु ती रेतीत फसलेली असल्यामुळे स्थानिक मासेमारांसह नागपूरच्या आपत्ती निवारण पथकाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या कारमध्ये राहुल पितळे यांचा मृतदेह आढळला.घटनेच्या रात्री शैलेश मेश्राम यांना घरुन फोन आल्यामुळे ते सालेबर्डीहून एका दुचाकीने घरी परतले. (जिल्हा प्रतिनिधी)
‘त्यांचे’ मृतदेह शोधण्यात यश
By admin | Updated: August 17, 2014 00:46 IST