मुंबई : एका चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीला फूस लावून व भीती दाखवून नौदलातील चौघा जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघा जणांना कफ परेड पोलिसांनी अटक केली असून एक जण प्रशिक्षणासाठी परगावी गेला आहे. जितेंद्रसिंग दारागोकुल वालचंद (२४), पवन ऊर्फ ओमपाल हुशारसिंग (३१) व राकेश प्रसाद सिंग (४१) व पृथ्वी उमेशसिंग चव्हाण अशी त्यांची नावे असून पृथ्वी हा प्रशिक्षणासाठी गेल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले. नौदलाच्या अधिकारी व जवानांसाठी कफ परेड येथे असलेल्या क्वार्टर्समध्ये हे सर्व जण राहतात. संबंधित शाळकरी मुलीशी जानेवारी महिन्यात पृथ्वीने परिचय वाढविला. जूनच्या पहिल्या आठवड्यात तिला एका खोलीत नेऊन फूस लावून बलात्कार केला. त्याच्याकडून ही माहिती समजल्यावर जितेंद्र सिंगने संबंधित मुलीशी संपर्क साधला, तुझ्या आई-वडिलांना ही बाब सांगू, अशी धमकी देत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अशाच प्रकारे पवन व राकेश सिंग यांनी भीती दाखवून वेगवेगळ्या जागी नेऊन बलात्कार केला. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर काल रात्री तिच्या पालकांनी त्याबाबत कफ परेड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी नौदलातील अधिकाऱ्यांशी े संपर्क साधून रात्री उशिरा जितेंद्र व पवनला अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यावर ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. राकेशला अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नेव्हीच्या जवानांकडून विद्यार्थीनीवर बलात्कार
By admin | Updated: July 21, 2015 01:55 IST