मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन सेवेची भार्इंदर येथून उत्तन चौक, मनोरीसाठी असलेली बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे बसफेऱ्या वाढवण्याची मागणी येथील स्थानिक प्रवासी संघटनेने वारंवार केली आहे. मात्र, त्याला पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.भार्इंदर पश्चिमेच्या मुर्धापासून थेट उत्तन चौक तसेच मुंबई हद्दीतील गोराई-मनोरी या गावांसाठी मीरा-भार्इंदर महापालिकेची एकमेव परिवहन सेवा उपलब्ध आहे. ही गावे भार्इंदर स्थानकापासून दूर असल्याने प्रवाशांना रिक्षांचे भाडे परवडत नाही. शिवाय, मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी भार्इंदर, गोराईला जातात. त्यामुळे बसफेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, येथील बस मार्ग उत्पन्नाच्या दृष्टीने फायद्याचे आहेत. असे असतानाही पालिका व सत्ताधारी मात्र जादा बसफेऱ्यांसह आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी भार्इंदर-उत्तन-चौक-मनोरी प्रवासी संघटनेमार्फत सातत्याने महापालिका व पालिकेतील पदाधिकाऱ्यांना निवेदने व तक्रारी दिल्या आहेत. सध्या भार्इंदर ते उत्तन व चौकदरम्यानची सेवा अपुरी पडत आहे. त्यात वाढ करावी. भार्इंदर ते मनोरी अशी बस मार्ग क्र. ३ ची बंद केलेली सेवा त्वरित सुरू करा, उत्तन-मनोरी बसमार्गावर फेऱ्या वाढवा, भार्इंदर ते भाटेबंदर मिनी बससेवा सुरू करावी, महत्त्वाच्या बसथांब्यांवर वेळापत्रक लावा, थांब्यांच्या परिसरातील रिक्षांना प्रतिबंध करा, आदी मागण्या सचिवांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)>शाळेतच पास सुविधा द्याभार्इंदर, गोराई परिसरात अनेक शाळा आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी महापालिका परिवहन सेवेच्या बसने प्रवास करतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सवलतीचा पास व ओळखपत्र या परिसरातील शाळांमध्ये उपलब्ध करून द्या, अशी मागणी संघटनेचे सचिव लिओ परेरा केली आहे.
बसफेऱ्यांअभावी विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Updated: July 4, 2016 02:44 IST