कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अन्य साथीदारांची नावे सांग, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी हो म्हण, त्यासाठी तुला माफीचा साक्षीदार बनवून २५ लाख रुपये देतो, असा साहेबांचा निरोप आहे. नाही म्हटल्यास तुला फासावर लटकविण्याची तयारी आम्ही केली आहे, अशी धमकी अनोळखी पोलिसाने दिल्याची धक्कादायक माहिती संशयित समीर गायकवाड याने शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयास दिली.समीरने केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. यादव यांनी तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले. समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत शनिवारी संपणार होती. सुरक्षेच्या कारणास्तव समीरला शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. यादव यांच्यासमोर हजर केले. या वेळी समीरने न्यायालयासमोर गोपनीय माहिती उघड केली. त्या वेळी समीरने, माझ्या ब्रेन मॅपिंग चाचणीच्या सुनावणीदरम्यान ९ आॅक्टोबरला न्यायालयात जात असताना एक अनोळखी व्यक्ती जवळ आली आणि त्याने ‘मी पोलीस आहे. तुला साहेबांचा निरोप आहे,’ असे सांगून त्याने ही धमकी दिल्याचे सांगितले.त्यावर न्या. यादव यांनी तू त्या व्यक्तीला पाहिलेस का? त्यावर त्याने माझ्या तोंडाला बुरखा घातला होता. मला चालत असताना पोलीस पायऱ्या आहेत, पाय उचलून टाक, असे सांगत होते. न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी माझा बुरखा काढला. त्यामुळे त्याला मी पाहिलेले नाही. मग तू न्यायालयात तक्रार का केली नाहीस, असे न्या. यादव यांनी विचारले असता त्याने मला काहीच सुचत नव्हते. पुन्हा सांगायचे म्हटले, तर त्यानंतर मला न्यायालयात हजर केले नसल्याचे सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू.टी. मुसळे यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी) समीरला न्यायालयासमोर काही बोलायचे आहे; परंतु सरकारी यंत्रणा त्याला ते सांगण्याची संधी उपलब्ध करून देत नव्हती. ब्रेन मॅपिंग सुनावणीनंतर तीन सुनावण्या झाल्या. त्यापैकी एकाही सुनावणीसाठी त्याला हजर केलेले नाही. शनिवारी त्याने न्यायालयास दिलेल्या माहितीचा योग्य दिशेने तपास व्हावा. - अॅड. एम.एम. सुहासे, समीर गायकवाडचे वकीलसमीर गायकवाडला जे काही सांगायचे होते ते पत्रव्यवहाराद्वारे तो सांगू शकत होता. त्याने जी माहिती न्यायालयास दिली त्याची चौकशी व्हावी; परंतु केवळ प्रसिद्धी व जामीन मंजूर करण्यासाठी त्याच्या वकिलांच्या उठाठेवी सुरू आहेत. - अॅड. विवेक घाटगे, फिर्यादीचे वकील
‘ब्रेन मॅपिंग’साठी माझ्यावर दबाब
By admin | Updated: November 22, 2015 01:30 IST