मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांची प्रत मिळवण्यासाठी अनोळखी व्यक्ती धडपड करीत होता. या धडपडीने न्यायालयीन कर्मचारीही चिंतेत होते. खुद्द न्यायालयानेच ही बाब बुधवारी ठाकरे बंधूंच्या वकिलांच्या निदर्शनास आणली. महत्त्वाचे म्हणजे हे साक्षीपुरावे राजकीय हेतूने घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते का, अशी शंकाही न्यायालयाने व्यक्त केली. याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. मात्र यापुढे वकील असल्याचे अधिकृत ओळखपत्र दाखवल्याशिवाय साक्षीपुराव्यांची प्रत देऊ नका. मात्र प्रती घेण्यासाठी शिकाऊ वकिलाला पाठवले जाईल, असे ठाकरे बंधूंच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यानंतर या चिंतेच्या मुद्द्यावर पडदा पडला.बाळासाहेबांचे मृत्युपत्र प्रमाणित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात प्रोबेट केले होते. यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे यावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावरील सुनावणीत न्या. पटेल यांनी वरील बाब उघडकीस आणली. तसेच ही अनोळखी व्यक्ती अॅड. सीमा सरनाईक यांच्याकडून आल्याचे सांगत होता, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर जयदेव यांच्या वकील सरनाईक व उद्धव यांचे वकील राजेश शहा यांनी वरील पर्याय दिला.( प्रतिनिधी)
पुराव्यांसाठी अनोळखी व्यक्तीची धडपड
By admin | Updated: June 11, 2015 08:50 IST