- वसंत भोसलेबेळगाव, कोल्हापूर, सांगली या सीमेवरील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात तंबाखू उत्पादन घेतले जात होते. तंबाखूची सर्वांत मोठी बाजारपेठ निपाणी होती. शेकडो खासगी व्यापाऱ्यांच्या हातात तंबाखू आणि विड्या तयार करणारी प्रचंड गोदामे होती. मात्र, तंबाखूला वर्षानुवर्षे किमान भाव मिळत नव्हता. त्याचा सर्वांत मोठा असंतोष केंद्रात जनता पक्षाची राजवट आल्यावर जाणवू लागला. दहा-बारा रुपये किलोप्रमाणे विकला जाणाऱ्या तंबाखूचा दर रुपया-दीड रुपयापर्यंत खाली आला. निपाणीच्या कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना पाचारण केले. १९८० च्या डिसेंबरपासूनच गावोगावी प्रभातफेऱ्या, बैठका, जाहीर सभा सुरू झाल्या होत्या. त्याला राजकीय पक्षांची दारे तोडून शेतकरी प्रतिसाद देत होता. कर्नाटकात काँग्रेसचे आर. गुंडुराव यांचे सरकार होते.फेब्रुवारी १९८१ मध्ये शरद जोशी यांनी निपाणीचा प्रथम दौरा केला. १४ मार्च रोजी रास्ता रोकोची घोषणा झाली. हे आंदोलन सलग २३ दिवस चालले. खासगी व्यापारी तंबाखू खरेदी न करण्यावर ठाम होते. अखेरीस कर्नाटक सरकारने आंदोलन मोडून काढण्याचे ठरविले.६ एप्रिल हा आंदोलनाचा २४ वा दिवस होता. गुढीपाडवा सण होता. शेतकऱ्यांचा इतका पाठिंबा असताना सरकार दंडेलशाही करणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की, रात्री घरी जाऊन सकाळी पाडव्याचा सण करून दुपारी परत आंदोलनात उतरा. निवडक कार्यकर्त्यांसह ते स्वत: मात्र रस्त्यावर बसून होते. त्याच रात्री पोलीस कारवाई सुरू झाली. जोशी यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक करून गुलबर्गा आणि बेळगावच्या कारागृहात डांबले गेले. ही वार्ता गावोगावच्या शेतकऱ्यांना कळताच, हजारो शेतकरी आंदोलनस्थळाकडे धाव घेऊ लागले. त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार सुरू झाला. शरद जोशी यांना अटक झाल्याचे समजताच जमाव संतप्त होत होता. कर्नाटक पोलिसांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात १३ शेतकरी ठार झाले आणि गुढीपाडव्याच्या सण हा (६ एप्रिल) काळा दिवस ठरला. (लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूरचे आवृत्तीचे संपादक आहेत)
शेतकरी आंदोलनाचा झंझावात
By admin | Updated: December 13, 2015 01:25 IST