बापुसाहेबांचे जावई डॉ. उदय बोधनकर यांची प्रतिक्रिया नागपूर : माजी केंद्रीय मंत्री वसंत उपाख्य बापुसाहेब साठे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. ते इतरांसाठी झटले. त्यांनी माणसे जमविली, पैसा नाही. त्यांचे स्वीस बँकेत खाते असल्याचे वृत्त खोटे व मनस्ताप देणारे आहे, अशी प्रतिक्रिया बापुसाहेबांचे जावई आणि येथील प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंडमधील ‘एचएसबीसी’ या खासगी बँकेत खाती असलेल्या भारतीय नागरिकांची यादी एका वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे. तीत उद्योजकांसह राजकीय व्यक्तींच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांच्या कुटुंबीयांचीही नावे असल्याचे म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोकमतने डॉ. बोधनकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बापुसाहेबांचे विदेशात कुठेही बँक खाते नाही. त्यांनी पैशाला कधीच महत्त्व दिले नाही. कधी भ्रष्टाचार केला नाही. देशहितासाठी ते सदैव झटले. त्यांचे दिल्लीत स्वत:चे घर किंवा बंगला नाही. ते गुडगावमध्ये मुलाकडे राहिले. साठे यांच्यावर कधीही शिंतोडे उडाले नाहीत. कुणाची जागा मारली नाही. शिक्षण संस्था उभारली नाही. त्यांच्यावर विरोधकांनीही कधी अशा अर्थाने टीका केली नाही. बापुसाहेब स्पष्ट आणि परखड होते आणि असे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती पैशाला कधीच महत्त्व देत नाही. बापुसाहेबांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविणारा हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
साठेंनी माणसे जमविली, पैसा नाही!
By admin | Updated: February 10, 2015 00:54 IST