गडचिरोली : आघाडी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्पात प्रचंड योजना घातल्या होत्या. राज्याच्या उत्पन्नाचा विचार न करता या योजना जाहीर केल्या. मात्र नवे राज्य सरकार राज्याचे जेवढे उत्पन्न आहे, तेवढाच अर्थसंकल्प जनतेसमोर सादर करेल व त्याची पूर्तताही करेल. यात अनेक योजनांना कात्री लावली जाईल, असे स्पष्ट संकेत अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिले. गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते़ जानेवारीअखेर चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीची घोषणा केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले़ गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांत व्यसनमुक्ती कार्यक्रमावर भर दिला जाणार असून, यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे चार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले़ गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटन, इको टुरिझमला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. पेसा कायद्यात गैरआदिवासींसाठी नोकरभरती बंद झाली आहे. याबाबत मुनगंटीवार यांनी लोकांचे याविषयी अनेक गैरसमज आहेत, असे सांगून वेळ मारून नेली. (प्रतिनिधी)
उत्पन्नाएवढाच राज्याचा अर्थसंकल्प तयार होणार
By admin | Updated: January 13, 2015 02:54 IST